मुंबई- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर राज्यातदेखील पडसाद उमटत आहेत. आपचे सहसंयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते व नेते संतप्त झाले आहेत. आपकडून मुंबईतील ईडी कार्यालासमोर उशिरा आंदोलन सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी ४० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा मुंबई आपच्या अध्यक्ष प्रीती मेनन शर्मा यांनी केला.
मुंबई पोलिसांच्या कारवाईबाबत प्रीती मेनन शर्मा यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत पोलिसांसह डॉक्टरांवर आरोप केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, "पोलिसांनी मध्यरात्री आपच्या ४०हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. स्वातंत्र्यासाठी आता ही दुसरी लढाई आहे. आम्ही दीर्घकाळ लढ्यासाठी तयार आहोत. निळ्या कपड्यातील एका पोलिसांनी धक्का दिला. त्या पोलिसानं मद्यप्राशन केलं होतं," असा दावा आपच्या नेत्यानं केला.
-
The cop in blue civil clothes shoved me to the ground. He is drunk. @CPMumbaiPolice not answering calls. What law allows @mumbaipolice to detain women in the night and shove them around in a drunken state. @Dev_Fadnavis @mieknathshinde pic.twitter.com/gG0OMmmrPe
— Preeti Sharma Menon (@PreetiSMenon) March 21, 2024
संपूर्ण व्यवस्थाच विनोद- दुसऱ्या पोस्टमध्ये मुंबई आपच्या अध्यक्षांनी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांवरदेखील आरोप केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये की, "डॉक्टरनं चुकीची माहिती नोंदविली होती. रक्तदाबाचे आकडे चुकीचं नोंदविल्याचं आपच्या कार्यकर्त्यानं पाहिले. आम्ही हे पकडल्यानंतर त्या डॉक्टरनं कागद फाडले. ही संपूर्ण व्यवस्थाच विनोद झालाय." ही पोस्ट शर्मा मेनन यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग केलीय.
क्रूरता ही अविश्वसनीय- प्रीती मेनन शर्मा यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून मुंबई पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, "पोलिसांची आजची क्रूरता ही अविश्वसनीय आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री यांना मोदींच्या ईडीनं बेकायदेशीर अटक केल्यानंतर आम्ही आंदोलन करत होतो. तेव्हा पोलिसांनी आम्हाल खेचून नेत मारहाण केली. आम आदमी पक्षाचे प्रभाग अध्यक्ष अस्लम मर्चंट हे पोलीस निरीक्षकांच्या मारहाणीत जखमी झाले आहेत," असा दावा प्रीती मेनन शर्मा यांनी केला. "मध्यरात्री महिलेला ताब्यात घेतलं. मद्यप्राशन अवस्थेत तिला धक्का देण्यात आला. कायद्याप्रमाणं काय परवानगी आहे," असा प्रश्न प्रीती मेनन यांनी उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले. मुंबई पोलिसांच्या एक्स मीडिया खात्यावरून प्रीती मेनन शर्मा यांच्या पोस्टला प्रतिसाद देत अधिक माहिती मेसेज करण्याची विनंती केली आहे. त्यावर एका वापरकर्त्यानं मुंबई पोलिसांकडून मारहाण झाल्यावर अधिक काय सांगायंचं, असा टोला लगावला आहे.
राज्यभरात केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन- अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरात आपकडून आंदोलन करण्यात येणार आहेत. राज्यातही केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज सकाळी ११ वाजता आम आदमी पक्ष आणि इंडियाच्या घटक पक्षांना सोबत घेऊन राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका असलेल्या शहरांमध्ये निषेध आंंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती आप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
हेही वाचा-