पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा फरार असून आरोपीवर 1 लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं. या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका होत असून हे पोलिसांचं अपयश असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेवर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "एसटी महामंडळाच्या मार्फत खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. पोलिसांकडून कुठलंही दुर्लक्ष झालेलं नाही. खासगी सुरक्षा रक्षकांनी नक्कीच चुका केल्या आहेत. बसच्या समोरच सुरक्षा रक्षक कक्ष असताना तिथं सुरक्षा रक्षक नव्हते, म्हणून आरोपीला ती घटना करता आली. यावर नक्कीच काम करण्याची गरज आहे," असं यावेळी कदम म्हणाले.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली घटनास्थळाची पाहणी : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्कारची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 35, रा. शिक्रापूर) हा आरोपी फरार असून त्या आरोपीच्या शोधासाठी 13 पथक रवाना करण्यात आली आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट एसटी स्थानकात येऊन पाहाणी केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.
आरोपी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी घेतली दक्षता : यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, "स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेची माहिती घ्यायला मी आलो. ही घटना पहाटे 6 वाजताच्या सुमारास घडली आणि तक्रार ही 9 वाजता देण्यात आली. पोलिसांकडून जी कारवाई करायची होती, त्यांनी ती तत्काळ करायला सुरुवात केली. आरोपीला तत्काळ ट्रॅक करायला सुरुवात केली. आरोपीचा शोध घेतला जात आहे. त्याचे संभाव्य ठिकाण पोलिसांना मिळालं आहे. घटना बाहेर का कळवली नाही, असं विचारलं जात आहे. पण आरोपी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. ही घटना लपवली नाही, पण गुप्तता पाळली गेली आहे," असं यावेळी कदम म्हणाले.
पोलिसांनी घातली गस्त : "एस टी स्टँड परिसरात ही घटना घडली आहे. त्या दिवशी पोलीस किती वेळा स्वारगेट स्टँडमध्ये गेले हे सुद्धा मी बघितलं. रात्री एक वाजता आणि परत तीन वाजता पोलिसांनी स्वारगेट एसटी स्टँडमध्ये जाऊन गस्त घातली आहे. पोलीस अलर्ट नव्हते असं झालेलं नाही. घटनेच्या 5 तास आधी स्वारगेट स्टँडमध्ये पोलिसांचे 2 राऊंड झाले होते. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल," असं देखील यावेळी कदम म्हणाले.

पोलिसांकडून कुठलंही दुर्लक्ष झालेलं नाही : 22 तारखेला एसटी महामंडळानं पोलिसांना एक पत्र दिलं होतं, ज्यात इथं सुरक्षा देण्याची मागणी केली होती. याबाबत योगेश कदम यांना विचारलं असता ते म्हणाले की, "एसटी महामंडळाच्या मार्फत खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. पोलिसांकडून कुठलही दुर्लक्ष झालेलं नाही. जे खासगी सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी नक्कीच चुका केल्या आहेत. बसच्या समोरच सुरक्षा रक्षक कक्ष असताना तिथं सुरक्षा रक्षक नव्हते, म्हणून आरोपीला ती घटना करता आली, असं यावेळी कदम म्हणाले.

एसटी स्थानकात सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी परिवहन विभागाची : स्वारगेट परिसरात पोलिसांकडून 2024-25 मध्ये एका वर्षात 7 हजार 196 कारवाई करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचं दुर्लक्ष होते असं म्हणणं चुकीचं आहे. पोलीस अलर्ट मोडवर आहेत म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाईया झाल्या आहेत. स्वारगेट एसटी बसस्थानक इथं सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही परिवहन विभागाची आहे. त्यांच्या माध्यमातून खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेले आहेत. जर तिथं सुरक्षा रक्षक असते तर ही घटना घडलीच नसती, असं देखील यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
बस आगार व्यवस्थापकाचं पोलिसांना सुरक्षा पुरवण्यासाठी पत्र : स्वारगेट बस स्थानकाच्या आगार व्यवस्थापकानं स्वारगेट पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तब्बल दोन पत्र दिले होते. स्वारगेट आगारात तृतीयपंथी आणि खासगी एजंटची दमदाटी सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था पुरवण्यासाठी सुरक्षा पुरवावी, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या पत्रात आगार व्यवस्थापकानं रिक्षाचालक आगाराच्या बाजुला अवैध रिक्षा पार्किंग करण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करुन रिक्षा पार्किंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आंदोलक तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा फरार असून आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. आता या प्रकरणावरुन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "48 तास झाले असताना देखील आरोपी अटक होत नाही, याचा अर्थ हे सरकारचं अपयश आहे. याला सरकार जबाबदार आहे, असा आरोप यावेळी तृप्ती देसाई यांनी केला. तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बसस्थानक परिसरात आंदोलन केलं. मात्र यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम हे पाहणी करायला आल्यानंतर तृप्ती देसाई यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन : स्वारगेट चौक इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी देखील करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की "स्वारगेट बस स्थानक इथं पुणे पोलीस सुरक्षा पुरवण्यात अपयशी झाल्यानं ही घटना घडली आहे. स्वारगेट सारख्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होत आहे, हे खूप निंदनीय आहे. या प्रकरणातील आरोपीची सर्व माहिती असताना देखील आरोपीला अटक होत नाही, म्हणजे हे पोलिसांचं अपयश आहे. आमचा आरोप आहे, की हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्यानं त्याला पकडण्यात येत नाही, असा आरोप यावेळी जगताप यांनी केला.
हेही वाचा :