छत्रपती संभाजीनगर Marathi Bhasha Gaurav Din 2025 : मराठी भाषेला अधिकृत अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा साजरा होणारा 'मराठी भाषा गौरव दिन' खास मानला जात आहे. पुण्यातील गीत फुलोरा कविता गायनाचा कार्यक्रम आणि स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी यांच्या माध्यमातून विदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मराठी आणि अमराठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनं मराठी कवितांचं गायन सादर करत गौरव साजरा केला. आपली भाषा जगभरात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संगीताच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्याचं मत गीत फुलोरा निर्माते आणि स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक, संगीतकार अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
विदेशातून मराठी कवितांचं सादरीकरण : मराठी भाषा जगात अनेक ठिकाणी बोलली जाते. विदेशात राहूनही बहुतांश लोक आजही आपल्या मातीशी जोडले गेले आहेत. अशाच कुटुंबातील मुलं ऑनलाइन पद्धतीनं भारतीय संगीत शिक्षण ग्रहण करतात. त्याच माध्यमातून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनोखा उपक्रम केला. अमेरिका, कॅनडा, झिम्बाव्वे, यूएइ, जर्मनी, फ्रान्स, यूकेतील मुलांनी ऑनलाईन पद्धतीनं मराठी कविता आणि गाणी सादर केली. वि.म.कुलकर्णी यांची माझ्या मराठीची गोडी, कुसुमाग्रज यांची माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तसंच मराठीच्या थोरवीच्या अनेक कविता अभयार्पितासह विद्यार्थांनी सादर केल्या. गेल्या वीस वर्षांपासून मराठी भाषेच्या प्रसारासाठी अभयार्पिता कार्यरत आहेत. त्याचाच एक सारांश गीत फुलोराचे निर्माते, गायक, संगीतकार असलेले अभय आणि अर्पिता कुलकर्णी यांनी ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
महाराष्ट्रीयन पोशाखात सादरीकरण : मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना देश-विदेशात या मुलांनी महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला. ऑनलाइन पद्धतीनं एकाच वेळी भारतासह आठ देशातील मुलांनी सहभाग घेतला. देश वेगळे असले तरी मात्र एका स्वरात त्यांनी कवितांचं सादरीकरण सुरु केलं. वेगवेगळ्या कविता सादर करत अनोखा उपक्रम घेण्यात आला. विदेशात राहणारे तिथंच जन्मलेली मुलं तिथल्या संस्कृतीत वाढत आहेत. तिथली भाषा, संस्कृती त्यांनी अंगिकारली आहे. असं असलं तरी आजही आपल्या मातीशी जोडले जात आहेत, त्याचं माध्यम आहे संगीत. भारतीय संगीत शिकण्यासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी भारतातील संगीत अकॅडमी सोबत जोडले जात आहेत. अशाच पुण्यातील गीत फुलोरा काव्य गायन संच आणि स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी या संस्था कार्यरत आहेत. याच माध्यमातून हे अनोखे सादरीकरण करण्यात आलं.
अमराठी भाषिक मुलांनी देखील घेतला सहभाग : विदेशात राहून भारतीय संस्कृतीशी जोडले राहण्याचा प्रयत्न नागरिक करतात. देशातील वेगवेगळ्या राज्यातील विदेशी नागरिक संगीताचे धडे गिरवण्यासाठी भारतातील विविध संगीत संस्थांशी जोडले जातात. त्यामुळं वेगवगेळ्या भाषा बोलणारे भारतीय मुलं एकाच ठिकाणी जोडले जातात. अशाच नऊ देशातील मुलं एकत्र येत मराठी आणि अमराठी मुलांनी एकत्र येत मराठी भाषेतील कवितांचं सादरीकरण केलं. मराठी भाषेला अधिकृत अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. त्याचा आनंद असून जास्तीतजास्त लोकांपर्यंत मराठी भाषा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मत गीत फुलोरा संस्थेचे प्रमुख अर्पिता आणि अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :