कोल्हापूर : 'माझ्या मराठीची काय सांगू महती, सातासमुद्रापार आहे तिची ख्याती' असा मराठी भाषेचा महिमा सांगितला जातो. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी मराठी भाषा अजरामर व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न केले. मराठी भाषेचा गौरव वाढावा यासाठी छत्रपती शिवरायांचा एक मावळा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका गावात झगडत आहे. सीमा भागातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी या भागातच तरुणानं 'हॉटेल यश राजवाडा' सुरू केलंय. त्यानं हॉटेलमधील दालनांना महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची नावं दिली आहेत. सीमा भागात अस्सल मराठी बाणा जपणाऱ्या या तरुणाचं नाव आहे लक्ष्मीकांत पाटील. 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त पाहू सीमा भागातील मराठमोळ्या तरुणाचं मराठी प्रेम...
'या' कारणामुळं उच्चशिक्षित तरुणानं सुरू केला हा व्यवसाय : गेली 68 वर्ष महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद धगधगत आहे. सध्या, हा सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, सीमाभागातील मराठी हुंकार किंचितही कमी झालेला नाही. कर्नाटकातील कानडी सरकार मराठी भाषिकांवर संधी मिळेल तिथं अन्याय करतं. असंच उदाहरणं, प्रसंग बालपणापासून 'याची देही याची डोळा' पाहिलेल्या लक्ष्मीकांत पाटील या तरुणानं छत्रपती शिवरायांचा मराठी बाणा जपण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही केला. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेल्या लक्ष्मीकांतनं खासगी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या निमित्तानं दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील अनेक मेट्रो शहरात वास्तव्य केलं. यादरम्यान त्याला गावच्या जेवणाची चव कुठंच सापडली नाही. यामुळं त्यानं मराठमोळी शिवकालीन जेवणाची पद्धत असलेलं हॉटेल सुरू केलं.
किल्ल्यांची नावं देण्यात आली : बाहेरून पाहिल्यानंतर एखाद्या किल्ल्याप्रमाणं दिसणाऱ्या या हॉटेलचं नामकरणही लोकांनीच केलं असल्याचं सांगत राजवाड्याप्रमाणं दिसणाऱ्या हॉटेलला त्यानं नावही साजेसंच दिलं. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंचा भव्य पुतळा आपल्याला दिसतो. मराठी मनाला आपलंसं करणारी ही रचना पाहून प्रत्येकजण या हॉटेलचा असलेला देखणेपणा नेहाळतो. स्वागत कक्षात शिवकालीन ढाली, छत्रपती शिवरायांची तैलचित्रं आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आली आहेत. तर, हॉटेलमधील दालनांना महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक खवय्यांचं स्वागत गुळ आणि भुईमुगाच्या शेंगा देऊन मराठमोळ्या पद्धतीनं केलं जातं, हेच या हॉटेलचं वैशिष्ट्य. मराठी भाषा आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं लक्ष्मीकांत पाटील यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.
1600 मराठी भाषिक तरुणांना मिळाला रोजगार : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद कोणत्या ना कोणत्या कारणानं आजही धुमसत आहे. यामुळं सीमा भागातील 800 हून अधिक गावांमधील तरुणांच्या हाताला काम मिळत नसल्याची समस्या या भागात पाहायला मिळते. यावर उपाय म्हणून लक्ष्मीकांत पाटील यांनी पुढाकार घेत महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्रालयाच्या मदतीनं सीमा भागातील 5 हजार तरुण आणि तरुणींचा रोजगार मेळावा घेतला. "या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी प्रयत्न केले. त्यामुळं या भागातील सुमारे 1600 तरुण आणि तरुणींना प्रत्यक्ष कामं मिळाली आहेत," असं लक्ष्मीकांत पाटील सांगतात.
हॉटेलमधील दालनांना किल्ल्यांची नावं : मराठी संस्कृती रुजली जावी यासाठी हॉटेलमध्ये येणाऱ्या कुटुंबातील नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास आणि मराठी भाषेचं महत्त्व कळावं यासाठी हॉटेलमधील दालनांना किल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग, रायगड, राजगड, विशाळगड आणि पन्हाळा अशी दालनं हॉटेलमध्ये साकारण्यात आली आहेत. हॉटेलमध्ये भारतीय बैठक व्यवस्था असल्यानं जेवताना राजवाड्यात जेवण केल्यासारखं वाटत असल्याची भावना ग्राहकांनी बोलून दाखवली.
मराठी माध्यमांच्या शाळांना मदत : सीमा भागातील बेळगाव, कारवार आणि निपाणी या भागात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. न्यायालयात सीमा प्रश्न प्रलंबित असला तरी, या भागात मराठी भाषिक टिकला पाहिजे आणि मराठी भाषा नव्या पिढीत रुजली पाहिजे या उद्देशानं सीमा भागातील काही गावांमध्ये लक्ष्मीकांत पाटील यांच्या पुढाकारातून मराठी माध्यमांच्या शाळांना मदत केली जाते. तसंच हॉटेलच्या माध्यमातून सुमारे 50 मराठी तरुणांना पाटील यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं शिवकालीन मर्दानी खेळ, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर आधारित व्याख्यानं सीमा भागात आयोजित केली जातात. व्यावसायिक लक्ष्मीकांत पाटील यांच्या माध्यमातून सीमा भागात मराठीचा जागर सुरू असल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं.
हेही वाचा :