ठाणे Bihar Workers Death : पाण्याच्या टाकीचं काम करताना विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्यानं तीन कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलीय. ही घटना ठाण्यातील अंबरनाथ शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभुळ एमआयडीसी भागातील बारवी जल शुद्धिकरण केंद्र या ठिकाणी घडलीय. याप्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करुन पोलिसांनी तपास सुरू केलाय. शालीग्राम मंडल (18), राजन मंडल (19) गुलशन मंडल (18) अशी विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत.
अचानक आला विद्युत प्रवाह : मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ शहरापासून 8 किलोमीटर अंतरवर जांभुळ एमआयडीसी आहे. या एमआयडीसी भागात शहारा पाणीपुरवठा करणारे बारवी जल शुद्धिकरण केंद्र आहे. या जल शुद्धिकरण केंद्रात भूमिगत पाण्याच्या टाकीचं काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. या कामाचं कंत्राट दिलेल्या कंपनीचे या ठिकाणी किमान 30 ते 35 कामगार काम करत आहेत. यापैकी सहा कामगार 4 एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम करत असतांना पाणी उपसा करण्यसाठी इलेक्ट्रिकल पाण्याची मशीन लावण्यात आली होती. या मशीनमध्ये अचानक विद्युत प्रवाह पाण्यात पसरला. यावेळी टाकीत पाण्यात काम करणाऱ्या कामगारांना जोरदार विजेचा शॉक लागला. यात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांचा तपास सुरt : घटना घडताच इतर कामगारांनी घटनास्थळी धाव घेऊन विजेचा प्रवाह बंद करुन तिन्ही कामगारांना पाण्याच्या टाकीतून बाहेर काढलं. त्यांनी कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत तिघा कामगारांचे मृतदेह तपासणीसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केले. मृतक कामगार हे बिहार राज्याचे रहिवासी असून काही दिवसापूर्वीच ते रोजीरोटीच्या शोधात असताना या ठिाकणी कामाला लागल्याचं सांगण्यात आलं. दुसरीकडे या दुर्घटनेला संबधीत ठेकेदाराकडून मोठी चूक घडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनं केला. या प्रकरणी ठेकेदाराची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कल्याण तालुका ग्रामीण पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिलीय.
हेही वाचा :