नाशिक : स्वारगेट बस डेपोत बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली. चांदवड तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर सरपंचासह अन्य एकानं वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितांच्या आजीनंच यासाठी सहकार्य केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात सरपंचाविरोधात पोक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली.
काय आहे घटना? : पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीत, साधारण मार्च 2023 मध्ये सरपंच आणि आणखी एक आरोपी यांनी पीडितांच्या आजीला पैसे देऊन दोन्ही बहिणींचा ताबा मिळवला होता. त्यानंतर त्र्यंबकेश्वर, शिर्डी येथे नेत वेळोवेळी अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, संशयित आरोपीसोबत जाण्यास जेव्हा पीडित मुलींनी नकार दिला, तेव्हा आजीनं दोघींना चावा घेत आणि मारहाण करुन घरात कोंडून ठेवलं. आजीसह आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलींनी चांदवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोक्सोसह विविध कलमान्वये सरपंच, आणखी एक आरोपी आणि आजीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली.
पोक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल : बाजीराव महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपीविरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यात तिघा आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कास्टडीची मागणी केली जाणार आहे. यात सर्व तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं जाणार आहे."
महिलेचा विनयभंग : नाशिक शहराच्या अंबड भागात आणखी एक घटना घडली. घराच्या शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेला गच्चीवरून खडा मारून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी संशयितविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -
- पुणे बस बलात्कार प्रकरण: गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी केली घटनास्थळाची पाहणी, म्हणाले 'ही तर खासगी सुरक्षा रक्षकांची चूक'
- आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही, पुणे बलात्कारप्रकरणी अजितदादांचा संताप, तर सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात
- स्वारगेट बलात्कार प्रकरण : आरोपी दत्ता गाडेवर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर, तरुणीवर दोनदा झाला बलात्कार