मुंबई– मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो-3 च्या टप्पा दोनमधील बीकेसी ते आचार्य अत्रे चौकपर्यंतचा म्हणजे (वरळी नाका) 2-A टप्पा (मेट्रो–3 भुयारी टप्पा 2) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. मेट्रो तीनच्या भूमिगत दुसऱ्या टप्प्यात एकूण सहा स्थानके असणार आहेत. सुमारे 9 किलोमीटर लांबीचा हा टप्पा असून, त्याचे 95 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिलीय. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भूमिगत मेट्रो तीनच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी घेण्यात आल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिलीय.
सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच मेट्रो सेवा प्रवाशांच्या सेवेत : मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या भागात मेट्रो ट्रेनच्या अन्य चाचण्या सुरू असून त्या पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच मेट्रो सेवा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन म्हणजेच एमएमआरसीएल सुमारे 33 किलोमीटर लांबीच्या आरे ते नरिमन पॉईंट या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम करत आहे. त्यापैकी आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आला आहे. आता टप्पा दोनमधील बीकेसी ते आचार्य आत्रे चौक हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुंबई मेट्रो प्रशासनाने दिलीय.
सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार : मेट्रो मार्गाचे बहुतांश काम झाले असले तरी आणि चाचण्या योग्यरीतीने पार पडत असल्या तरी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष सेवेत दाखल करता येणार आहेत. त्यामुळे सर्व निकष पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याने एमएमआरसीएलने म्हटले आहे. त्यामुळे मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेत सदरचा टप्पा येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच आचार्य अत्रे चौक ते नरिमन पॉईंट हा तिसरा टप्पा जूनपर्यंत सेवेत येऊ शकणार आहे.
🚆Metro update: MMRC has commenced train movement for Phase 2A on the Dharavi to Acharya Atre Chowk stretch, covering 9.77 km and 6 stations! Stay tuned for more developments. #MMRC #MumbaiMetro #Phase2A#Aqualine pic.twitter.com/TmgTNqApUi
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) February 25, 2025
आरे ते बीकेसीदरम्यानची 10 स्थानके सेवेत : दरम्यान, भुयारी मेट्रो मार्गावर एकूण 27 स्थानके असून, पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी दरम्यानची 10 स्थानके सेवेत आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते आचार्य अत्रे चौकदरम्यान सहा स्थानके आहेत. या सहा स्थानकांमध्ये धारावी, शीतला देवी, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य अत्रे चौक या ठिकाणांचा समावेश आहे. आरे ते कप परेड या प्रकल्पाचा 2011 मध्ये डीपीआरनुसार 23 हजार 900 कोटी रुपये एवढा अपेक्षित खर्च होता. मात्र, वेळोवेळी मेट्रो स्थानकाच्या एन्ट्री पाॅईंटमध्ये करावा लागलेला बदल आणि विलंबामुळे खर्चात जवळपास साडे तेरा हजार कोटी रुपये एवढी मोठी वाढ होऊन हा खर्च तब्बल 37 हजार 276 कोटी रुपयांवर पोहोचलाय.
हेही वाचा -