मुंबई - ख्यातनाम गझल गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसापासून ते आजारी असल्याचं समजत. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पंकज उधास यांच्या यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. निवेदनात म्हटलंय की, 'पद्मश्री पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे'. पंकज यांना कोणत्या आजाराने ग्रासले होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी 11 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल रसिकांच्या मनात कायम रुतल्या असून त्या लोकांच्या ओठावरही आहेत. हिंदी चित्रपटात गझल यापूर्वीही अनेक चित्रपटातून दाखवली गेली असेल परंतु पंकज उधास यांनी गझलला लोकप्रियतेच्या कळसावर नेऊन ठेवले. 1980 मध्ये त्यांच्या आहत नावाच्या अल्बमला खूप लोकप्रियता लाभली. त्यानंतर त्यांच्या किर्तीत भर पडत गेली. त्यांची मुकरार, तरन्नम, मेहफिल अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली. त्यानंतरच्या काळात एक पार्श्वगायक म्हणून अनेक चित्रपटासाठी गायन केले. त्यांच्या अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली.
पंकज उधास हे गझल गायनाच्या विश्वातील एक मोठे नाव होते. त्यांनी खऱ्या अर्थाने हिंदी गझल घराघरात पोहोचवली. त्यांच्या 'चिठ्ठी आई है' या गझल गीताला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम' चित्रपटात या गझलचा समावेश करण्यात आला होता. पंकज उधास यांनी 'ये दिल्लगी', 'फिर तेरी कहानी याद आयी', 'चले तो कट ही जायेगा' आणि 'तेरे बिन' या गझलांना आपला आवाज दिला होता. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांचा पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात गौरव झाला होता.