नवी दिल्ली BJP MP On 'INDIA' : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे 'इंडिया' आघाडीतून कोणत्याही क्षणी बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमध्ये होत असलेली राजकीय उलथापालथ राज्यातही होणार असल्याची चर्चा करण्यात येत आहे. आता "महाराष्ट्रातही 'इंडिया' आघाडी तुटणार आहे. काँग्रेस पक्ष केवळ भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केवळ राहुल गांधी हे एकमेव विरोधक आहेत, असं दाखवण्यासाठी काँग्रेसची ही धोरणात्मक भूमिका होती," अशी टीका भाजपाचे खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी शनिवारी केली आहे.
आप कधीच इंडिया आघाडीसोबत नव्हता : पंजाबमध्ये आम आदमी पक्ष कधीच इंडिया आघाडीसोबत नव्हता. आम आदमी पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये आप स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आम्ही स्वबळावर लढून जिंकणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. हरियाणामध्येही त्यांची आघाडी होऊ शकली नाही, असं खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान मोदींना आव्हान देणारं कोण आहे : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यातच पंजाब आणि हरियाणात काँग्रेसला आम आदमी पक्षानं मोठा धक्का दिला आहे. त्यामुळं इंडिया आघाडीचं भवितव्य अधांतरीच आहे. त्यात आता भाजपाचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे. "देशात आज जी परिस्थिती आहे, त्यात भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारं कोण आहे," असा सवाल खासदार राधा मोहन दास यांनी केला. "इंडिया आघाडीतील पक्षाना ही बाब समजली आहे. आज देशात भाजपाची लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या बाजुनं राहिलो नाही, तर आपण राजकीय अस्तित्व गमावून बसू, अशी भीती त्यांना आहे," असंही खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ममता बॅनर्जी लढणार स्वबळावर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अगोदरचं आपण स्वबळावर लढणार असल्याचं घोषित केलं आहे. आपण 'इंडिया' आघाडीत आहोत, मात्र निवडणुकीत आपण स्वबळावर लढणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. त्यामुळं 'इंडिया' आघाडीला अगोदरच धक्का बसला आहे. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही स्वबळावर लढण्याचं जाहीर केल्यानं 'इंडिया' आघाडीला दुहेरी धक्का बसला आहे.
हेही वाचा :