यवतमाळ - शाळा म्हटल की संस्कार देणार ज्ञान मंदिर डोळ्यासमोर उभं राहत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. दारव्हा तालुक्यातील वरुड येथील शाळेत एका प्रतिभावंत शिक्षिका प्रतिभा सुकलकर यांनी टाकाऊ तेलाच्या कॅन पासून तयार केलेल्या कुंड्या कुतूहलाचा विषय बनला आहे.
विद्यार्थ्यांनी गोळा केल्या तेलाच्या कॅन-'माझी शाळा माझा उपक्रम' अंतर्गत वरूड येथील शाळेत भेटी दरम्यान केंद्र प्रमुख संतोष घवळे यांनी शाळेत रोपटे लावण्याकरिता कुंड्या ठेवण्याच्या सूचना केल्या. तेव्हा शाळेतील उपक्रमशील शिक्षिका प्रतिभा सुकलकर यांनी तेलाच्या कॅन पासून कुंड्या तयार करण्याची संकल्पना मांडली. याला सर्व शिक्षकांनी सहमती दर्शविली आणि त्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. दरम्यान शाळेत विद्यार्थ्यांना घरातील टाकाऊ तेलाच्या कॅन आणण्यास सांगितले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या आनंदाने विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. त्या कॅन स्वच्छ करून विशिष्ट आकार देण्यात आला. त्यावर सुबक रंग रांगोटी करण्यात आल्या आणि आकर्षक कुंड्या उदयास आल्या.
कुंड्यावर विद्यार्थ्यांचे नाव-
ज्या विद्यार्थ्याने कॅन आणली त्याचे नाव कुंडीवर टाकण्यात आले. सोबतच शब्द संग्रह वाढेल या हेतूने त्या कुंडीवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली. शिक्षिका सुकलकर यांनी प्रचंड मेहनत घेवून कुंड्या साजविल्या. कुंडीमध्ये झाडे लावून संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली. अतिशय कमी खर्चात तयार करण्यात आलेल्या कुंड्या लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीची आवड निर्माण करून ज्ञानदान करणारा हा उपक्रम कुतूहलाचा विषय बनला आहे.
हेही वाचा- आश्चर्यच.. महापौरांनी ज्वलनशील सॅनिटायझरच्या साठ्याजवळच घेतली रुग्णालयातील अग्निसुरक्षा आढावा बैठक