यवतमाळ - जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण यवतमाळ आणि नेर शहरातील आहे. आरोग्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी यवतमाळ आणि नेर या शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्यात येणार आहे. यात आरोग्य पथके शहरातील घरोघरी जाऊन सर्व्हे करतील. तसेच कोव्हिड-19 बाबत माहिती देऊन जनजागृती करणार आहेत.
घरी येणाऱ्या पथकाला नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून कम्युनिटी सोशल मेडिसीन अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांच्या सहकार्याने हा सर्व्हे होणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच नगर पालिका प्रशासनाने 12 ते 15 मे या चार दिवसात यवतमाळ शहरात सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एकूण 210 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ शहरातील सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर नेर शहरात आरोग्य पथकाकडून सर्व्हे करण्यात येणार आहे.
शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर प्रभागात हा सर्व्हे करण्यात येणार असून त्या अनुषंगाने ही पथके चार दिवस शहरात घरोघरी फिरणार आहेत. तपासणी करणाऱ्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या दिवशी व दिलेल्या प्रभागात वेळेत सर्व्हेक्षण पूर्ण करून जिल्हास्तरीय समितीला अहवाल सादर करावा लागणार आहे.