यवतमाळ - भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना पांढरकवडा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावास सुनावला आहे. 2013 मध्ये महावितरण कार्यालय पांढरकवडा येथील लेखापालास तोडसामला यांनी अश्लील शिवीगाळ आणि मारहाण केली होती. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने 2015 साली माजी आमदार राजू तोडसाम यांना सूनावलेली 3 महिने कारावासाची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालय पांढरकवडाने कायम ठेवली. त्यामुळे तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
2013 मध्ये घडले होते प्रकरण-
17 डिसेंबर 2013 ला काही लोकांचे वाढीव बिल कमी करण्यासाठी राजु तोडसाम आपल्या समर्थकासह विज वितरण कार्यालयात गेले होते. तेथील लेखापाल विलास आकोट यांचेशी त्यांचा वाद होऊन आकोट यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार आकोट यांनी दाखल केली होती. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी भादवी 294,352,353,506 नुसार गुन्हा दाखल केला होता.
10 साक्षीदार आले तपासण्यात-
कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणी 10 साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. व दिनांक 27 नोव्हेंबर 2015 ला राजू तोडसाम यांना कलम 294 मध्ये 3 महिने साधा कारावास आणि 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त 1 महिने कारावास. तर कलम 352 मध्ये 3 महिने साधा कारावास आणि 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 10 दिवस अधिकचा कारावास सुनावला होता. ही शिक्षा सुनावली तेव्हा राजू तोडसाम आर्णी विधानसभा आमदार होते.
शिक्षे विरोधात केले होते अपिल दाखल-
तत्कालीन आमदार राजू तोडसाम यांनी जिल्हा सत्र न्यायालयात शिक्षे विरोधात अपिल दाखल केले होते. या प्रकरणी 3 वर्षांनी आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पि. बि. नाईकवाड यांनी कानिष्ठ न्यायालय पांढरकवडा चा आदेश कायम ठेवला. आदेश येताच माजी आमदार स्वतःहून पोलीस स्टेशनला आल्याने पांढरकवडा पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करीत राजू तोडसाम यांची यवतमाळ कारागृहात रवानगी केली. शासनातर्फे सरकारी वकील आर.डी. मोरे यांनी तर राजू तोडसाम यांचे अॅड.गणेश धात्रक यांनी काम पाहिले तर संतोष राऊत हे पैरवी अधिकारी म्हणून उपस्थित होते.
या प्रकरणी आपण नागपूर उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी सांगितले. या शिक्षेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- सर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसात हेल्थ ऑडीट करणार - आरोग्यमंत्री