यवतमाळ - जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पिंपळखुटी नाक्यावर आज निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने एका बसमधून 30 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा राज्यातील तीघांना ताब्यात घेतले आहे. यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
आदिलाबाद येथून ही बस नागपूरला (एमएच 40 एक क्यू 6452) जात होती. या बसमध्ये सहा काळ्या बॅग होत्या. त्यात खाकी रंगाच्याच पेकेटमध्ये गुंडाळून 15 बंडल (साधारण 30 किलो) गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही बसची तपासणी निवडणूक विभागाच्या पथकाने करतेवेळी सदर बॅग कुणाच्या या बाबत विचारणा केली. त्यावेळी कुणी पुढे आले नाही. सर्व प्रवाश्यांची चौकशी केल्यानंतर देविदास राठोड (52, बाळतांडा, जि. बिदर), श्रीकांत पवार (21, रा. नामुर, जि. संघारेड्डी), रामनम्मा शामलू पारशामलू (35 रा. मंडपपेल्ल टेकमल,जि. राजमंडी) या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. असून हा गांजा कमी किमतीत खरेदी करून जादा किंमती मध्ये ते संशयित विकत असल्याचे तपासात पुढे आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजेश घोगरे, जमादार रंगलाल पवार, सुशील शर्मा, साहेबराव बेले यांच्यासह निवडणूक विभागाच्या पथकाने केली.