वाशिम - केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी व कामगार कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी आज वाशिम जिल्हा काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या या रॅलीत दोनशेहून अधिक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून या रॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर शिवाजी चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रॅलीची सांगता करण्यात आली.
ऊर्जामंत्री नितीन राऊत अनुपस्थित -
हे आंदोलन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वात होणार होते. मात्र, ते अनुपस्थित राहिल्याने या आंदोलनाचे नेतृत्व माणिकराव ठाकरे यांनी केले. यावेळी रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांच्यासह शेकडोच्या संख्येत काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - शेतकरी प्रश्न : आमदार रवी राणांचे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन
अमरावती, सांगली, कोल्हापुरातही रॅली-
केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संपूर्ण देशभर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात देखील ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून या कायद्याला विरोध करण्यात येत आहे. यापूर्वी राज्यात कोल्हापूर, सांगली आणि अमरावतीत ट्रॅक्टर रॅली पार पडली. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम उपस्थित होते. तर जवळपास 500हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. तसेच अमरावतीत देखील ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे झुणका भाकर खात आंदोलन