वर्धा- कोरोनाच्या लढ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोनाचा मंत्र दिला. सोशल मीडियावर हॅश टॅग करत 'गो कोरोना'ने धुमाकूळ घातला. त्यावर जोक्स, व्हिडिओ आणि बरंच काही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे कोरोनाविषयी जनजागृतीपर संदेश देताना अनोख्या मार्गांचा वापर केला जातोय. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील काही भन्नाट चित्रपटांच्या नावाचा उपयोग करत हे संदेश देणारे फलक वर्धा शरहात लावण्यात आले आहेत. शहरातील भाजीबाजारात त्यातीलच एक फलक म्हणजे 'डार्लिंग' सोबत व्हिडीओ कॉलवरच बोला. हे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
भाजीबाजार म्हटले तर नेहमी गर्दीचे ठिकाण अशी संकल्पना असताना रोटरीचे सदस्य अभियंता महेश मोकलकर यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणारा आदर्श असा भाजी बाजारा तयार केला. या भाजीबाजारात लावलेले फलक लक्ष वेधत आहे.
कोरोनाच्या संदेशाची 'दुनियादारी' नेमकी कोणी सांगितली...
मुंबईतील व्हिज्युअल जंकीज या कंपनीच्यावतीने हे फलक तयार करण्यात आले. साधारण महिन्याभऱ्या पूर्वी क्रिएटिव्ह पद्धतीने शब्दांची सांगड घालत मराठी चित्रपटांच्या नावाला शब्द जोडले. यातूनच कोरोनासारख्या संकटाला सामोरे जाण्याचे नियम गमतीशीर पद्धतीने सांगण्यात आले. यात चित्रपटाच्या नावांचा वापर करण्यात आला. यामुळे लोकांनी 'सैराट' होत न फिरता घरात राहण्याचा संदेश दिलखुलास पद्धतीने देण्यात आला.
शब्दांची 'बनवाबनवी' नेमकी आहे तरी कशी
विनाकारण 'प्रवास' टाळा, 'डार्लिंग' सोबत व्हिडीओ कॉलवरच बोला, सध्याचा काळ पाहता 'बकेट लिस्ट' मध्ये सॅनिटायझर ठेवा, 'टाईमपास' घरात बसूनच करा, 'मुंबई पुणे मुंबई' प्रवास काही दिवस केला नाही तरी चालेल, टपरीवर नको तर आता घरातच 'खारी बिस्कीट' खा यासारखे भन्नाट शब्द जोड चित्रपटांच्या नावाखाली केली जाणार आहे.
वर्धा शहरातील सोशल डिस्टन्सिंग पाळणारा हा भाजी बाजार चर्चेत असून याची चर्चा सोशल मीडियावरून दिल्लीत पोहचली. यामुळे अनेकजण भाजी बाजाराचा पॅटर्न नेमका कसा हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळात सामाजिक अंतर ठेवण्याचा मार्ग वर्धेच्या सामाजिक संस्थेने इतरांना दिला आहे