ठाणे - दुपारच्या उकाड्याने कासावीस झालेल्या विषारी-बिन विषारी साप बिळातून बाहेर पडत थंड ठिकाणाच्या शोधात मानवी वस्तीत घुसल्याचे अनेक घटना समोर येत आहे. अशाच २ घटना आज कल्याण पश्चिम परिसरात घडल्या आहेत.
जिल्ह्यात मागील २० दिवसापासून उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांसह मुक्या प्राण्यांचाही जीव कासावीस होवू लागल्याचे दिसून आले आहे. कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावात शेतावरील पडक्या घरात भलामोठा साप घुसल्याचे येथील शेतकऱ्याने पाहिले. बहुदा कडक उन्हामुळे या सापाचा जीव बिळात कासवीस झाल्याने त्याने बिळातून बाहेर पडून तो थंड ठिकाणच्या शोधात पडक्या घरात साप घुसला आणि वेटोळे घालून बसला होता.
ही घटना शेतकऱ्याला माहिती पडताच त्यांनी सर्पमित्र हितेशला ही माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेश याने घटनास्थळी येवून या सापाला पकडले. हा साप ६ फुटाचा असून तो धामण जातीचा आहे. विशेष म्हणजे उन्हाचा फटका या सापाला बसल्याने त्याची हालचाल बंद झाली होती. मात्र, त्याला थंड पाण्याच्या टबात ठेवले असता त्याने किमान २ ते ३ लिटर पाणी पिल्याची माहिती सर्पमित्र हितेश याने दिली.
दुसऱ्या घटनेत कल्याण-पश्चिमेकडील आधारवाडी परिसरातील अन्नपूर्णा नगरातील एका घराच्या ओसरीत मागील २ दिवसपासून हिरवा पडद्यामागे हिरवागार साप लपून बसला होता. घर मालकाने ओसरीत हिरवा साप घुसल्याची माहिती सर्पमित्र हितेशला दिली. त्यानंतर हितेशने घटनास्थळी येऊन या हिरव्यागार सापाला पकडून पिशवीत बंद केले. हा हरणटोळ जातीचा साप असून तो ६ फुट लांबीचा आहे. या दोन्ही सापाला वन अधिकाऱ्यांची परवानगी घेवून जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली.