ठाणे - शिवसेना-भाजप युती आमचा विचार करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे युतीतून बाहेर पडण्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत राहणेच फायद्याचे असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आठवले हे उल्हासनगरमध्ये एका खासगी कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.
सध्या युतीशिवाय रिपाईसमोर दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपसोबत जागा सोडण्याची चर्चा करून दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई या जागा मिळाव्यात, अशी मागणी केली जाईल. तसेच शिवसेना भाजपने आम्हाला त्यांच्या कोट्यातली एक-एक जागा द्यावी. आमच्या २ जागा निवडून आल्या, तर पक्षाला महाराष्ट्रात मान्यता आणि चिन्ह मिळेल, असे आठवले यावेळी म्हणाले. शिवसेना आणि भाजपची मनजुळणी होऊन युती झाल्याने त्यांचे नेते आमचा विचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे रिपाई कार्यकर्त्यांमध्ये युतीतून बाहेर पडण्याची भावना निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तरी युतीतून बाहेर पडणार नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. काँग्रेसचे अनेक खासदार निवडणुकीत पडल्यानंतर वर्षानुवर्षे सरकारी बंगल्यात राहिले. मात्र, काँग्रेसने माझे सामान दोनच महिन्यात बाहेर काढून फेकल्याची खंत पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केली.
पुलवामा हल्ल्यावरून राज ठाकरेंचे मोदींवरील आरोप योग्य नाही
पुलवामा हल्ल्यवरून मोदींवर आरोप करणाऱ्या राज ठाकरेंवरही रामदास आठवलेंनी यावेळी टीका केली. राज ठाकरे नेहमी राष्ट्रवादी भूमिका घेतात. मात्र, निवडणुका आल्याने मोदींनी ४० जवान मारले, हे आरोप योग्य नाही. सर्जिकल स्ट्राईक केला तर विरोधक पुरावे मागतात. नाही केला तर टीका करतात, ही दुटप्पी भूमिका असल्याचेही आठवलेंनी म्हटले. तसेच मसूद अजहरसोबतच दाऊद इब्राहिमलाही पाकिस्तानने भारताच्या ताब्यात द्यावे. इम्रान खान यांची भूमिका सकारात्मक दिसत आहे. यामुळे त्यांनी आता दहशतवाद संपवावा आणि भारताशी मैत्री करावी. तरच भारत पाकिस्तानला विकासात मदत करेल, असेही ते म्हणाले.