नवी मुंबई - पनवेलमधील पटेल हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने महिलेवर उपचार केल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
वकील अश्विनी थवई यांचा झाला मृत्यू
पोटातील पिशवी साफ करण्यासाठी अश्विनी थवई (36) या व्यवसायाने वकील असलेल्या महिला पटेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. ऑपरेशनच्या वेळी त्यांना भूल जास्त प्रमाणात देण्यात आली. डॉक्टरांकडून ऑपरेशन करताना रक्तस्रावही जास्त प्रमाणात झाला. मात्र, नातेवाईकांना याबद्दल कळवण्यात आले नाही.
चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने रुग्णाचा मृत्यू
पटेल हॉस्पिटलमध्ये या रुग्णाचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह होता. मात्र, तरीही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व चुकीचे उपचार केले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी रागाच्या भरात पटेल हॉस्पिटलची तोडफोड केली.