ठाणे - वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी आणलेल्या केकमध्ये आळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. याप्रकरणी केकशॅाप मालकाविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीही वडापावमध्ये पालीचे मेलेले पिल्लू, तसेच बुंदी व चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. आता चक्क वाढदिवसाच्या केकमध्ये आळी असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.
अंबरनाथ शहरात राहणाऱ्या संगीता झेंडे यांनी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 'ओ केक' या दुकानातून केक आणला होता, मात्र त्यात अळ्या आढळल्याने त्यांना धक्काच बसला. या बाबत त्यांनी केकशॉप दुकानदाराकडे तक्रार केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर देवून तिला दुकानातून हुसकावून लावले. त्यामुळे संतापलेल्या महिलेने दुकानाबाहेर आरडाओरडा करत गोंधळ घातला.
त्यानंतर त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात 'ओ केक' दुकान मालकाविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीवरून अंबरनाथ पोलीस पुढील तपास करत आहेत.