ठाणे : ही घटना डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा भागातील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे. तेजस श्यामसुंदर शिंदे ( वय, २०) असे वडिलांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. तर श्यामसुंदर शिंदे (वय ६८ ) असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे.
तेजस आणि वडीलाचा वाद: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील खंबालापाडा भागातील भोईरवाडी परिसरातील शिवनंदी भूमी चाळ मधील एका खोलीत मृतक श्यामसुंदर शिंदे त्यांची पत्नी आणि मुलगा तेजस सोबत राहत होते. आरोपी मुलगा तेजस हा डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर मृत वडील मुंबई महापालिकेच्या सुरक्षा विभागात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर १० वर्षांपूर्वी वडील सेवानिवृत्त झाले होते. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून वडील श्यामसुंदर शिंदे आजारी होते. आजारपणामुळे ते सतत मुलासोबत कटकट करत होते. त्यामुळे मुलगा तेजस आणि वडील श्यामसुंदर यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते.
डोक्यात दगडाचे जाते घातले: वादाला वैतागून २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मृत श्यामसुंदर यांची पत्नी काही कामासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळीही पुन्हा मुलगा तेजस आणि वडील श्यामसुंदर यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर वडील घरात झोपले असतानाच, कटकटीमुळे संतापलेल्या तेजसने वडील श्यामसुंदर यांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तेजसने स्वत: टिळकनगर पोलीस ठाण्यात फोन करून आपण वडिलांची हत्या केल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत श्यामसुंदर यांचा मृतदेह शवविच्छदेनासाठी महापालिकेच्या शासकीय रुग्णलयात रवाना करून आरोपी मुलाला ताब्यात घेतले.
जिल्हा सत्र न्यायालयात हजर: सरकार तर्फे पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे यांच्या तक्रारीवरून मुलगा तेजसवर हत्येचा गुन्हा टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल करून त्याला अटक केली आहे. गुरुवार दुपारच्या सुमारास आरोपी तेजसला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक पाडुरंग पीठे यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा: Chapra crime news वाळू माफियांनी केला खाण निरीक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न