ठाणे: याप्रकरणी 'एटीएस' ठाणे युनिटच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी मृत व त्याच्या इतर अज्ञात साथीदारांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील गौरीपाडा भागातील इंदू कंपाऊंडमध्ये अजहान अपार्टमेंट नावाची इमारत आहे. त्याच्या पाचव्या मजल्यावर बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे मुंबई 'एटीएस' आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाचव्या मजल्यावर पहाटे 6 वाजता छापा टाकला.
पाचव्या मजल्यावरून घेतली उडी: पोलीस पथक आपल्या मागावर आले असून आता अटक करणार या भीतीने आरोपी अन्सारीने कॉम्प्युटर आणि इतर उपकरणे अपार्टमेंच्या खिडकीतून शेजारील कंपाऊंडमध्ये फेकली. यानंतर त्याने स्वत:ही पळून जाण्याचा प्रयत्न करत इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून उडी घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रवाना केला. तसेच आरोपी कडील बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालविण्यासाठी लागणारे 2 लाख 71 हजार 200 रुपयांचे विविध उपकरणे जप्त केली आहेत.
एजंटमार्फत थाटले कॉलसेंटर: या घटनेनंतर ठाणे युनिटच्या 'एटीएस' पथकाचे उपनिरीक्षक संदीप रांगडेकर यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक टेलिफोन नेटवर्कद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात अडचणी येत असल्याने माहिती, तंत्रज्ञान मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागते; परंतु मृतक आरोपी अन्सारीने असे न करता आपल्या जवळच्या एजंटमार्फत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर स्थापले होते. संबंधित मंत्रालयाला याची कुनकुन लागल्याने 'एटीएस' पथकाने तांत्रिक तपास करून त्यावर छापा मारला.
बेकायदा एक्सचेंजवर यापूर्वीही छापा: यापूर्वीही भिवंडी शहरातील सुभाष नगर, नालापार, येथील मतीन शेख चाळीत बेकादेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याची माहिती मुंबई 'एटीएस' पथकाच्या ठाणे युनिटला मिळाली होती. याआधारे 15 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारच्या सुमारास पथकाने बेकायदा एक्सचेंजवर छापा टाकला होता. त्यावेळी भिवंडी तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत परिसरात राहणारा तबरेज सोहराब मोमीन हा एजंट आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याचे समोर आले होते.
हेही वाचा: Drain Cleaning: नाले सफाईमध्ये ८ कोटींचा महाघोटाळा? घोटाळ्याची चौकशी करण्याची मनसेची मागणी