ठाणे : ठाण्यातील आनंद आश्रम येथे रविवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेला अभिनेते शरद पोंक्षे, राज्य समन्वयक नरेश म्हस्के, माजी आ. रविंद्र फाटक उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधी अयोध्या दौऱ्यात काही आमदारांना विमानातून उतरावे लागल्याने रामाचे दर्शन झाले नव्हते. तेव्हा, येत्या ९ एप्रिलला सर्व आमदार-खासदारांसमवेत अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले. अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा, आस्थेचा विषय आहे. अयोध्येत भव्य राम मंदीर उभारले पाहिजे हे स्वप्न बाळासाहेबांचे होते ते पंतप्रधानांनी पूर्ण केले आहे. तेव्हा, खारीचा वाटा म्हणून जशी धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी चांदीची वीट पाठवली तशीच आम्ही देखील आता महाराष्ट्रातून सागाची लाकडे अयोध्येला पाठवल्याचे मुख्यमंत्रानी सांगितले.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा टोला: मविआच्या वज्रमूठ सभेबद्दल छेडले असता मुख्यमत्र्यांनी, संभाजीनगरमधील आजची सभा पाहून बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या. ही खोटी लोकं आहेत. सत्तेसाठी हपापलेली मंडळी आहेत. ज्या संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करीत होते त्याच संभाजीनगरमध्ये ही सभा झाली. हे दुर्दैव असून मविआची ही वज्रझुठ सभा असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष पुढे नेत असताना काही घटना अशा घडल्या त्या आम्ही आणि सर्वांनी अनुभवल्या आहेत. शिवधनुष्य पेलण्याकरता तेवढे मोठे मन आणि विचार लागतात. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम त्यावेळी बाळासाहेबांनी केले. पण आता हे सर्व कालबाह्य झाले. आता फक्त स्वतःपुरता विचार करून मी आणि माझा परिवार अशा विचाराने लोकं काम करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली
धनुष्यबाण चोरला, पण...: धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आज आमचा धनुष्यबाण काही काळासाठी चोरीला गेला आहे. कागदाचा बाण जरी काढून घेतला तरी भगवान श्रीराम माझ्या पाठीशी आहेत. तुमच्यासारखे बाण, ब्रह्मास्त्र माझ्या भत्त्यात आहे, असे ते म्हणाले.
ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव, धनुष्यबाण पक्षाचे देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. या आयोगाच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने टीका करत आहेत. आज रामनवमीनिमित्त, त्यांनी आज धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे सेनेवर जोरदार फटकारे ओढले. नागपूरमधील रामटेक येथील प्रभु राम मंदिरावरील झेंडा उद्धव ठाकरे यांना देण्यात आला.
लोकशाही वाचवणे महत्त्वाचे : उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आज रामनवमी आहे. सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. सध्या देशात लोकशाही वाचवणे महत्त्वाचा आहे. हे काम माझे एकट्याचे नाही. आपल्या पुढील पिढ्यांसाठी सर्वाना एकत्र यावेच लागणार आहे. आपल्या देशाचे आता 75 वे वर्षे आहे. आपल्या देशासाठी स्वातंत्र्य हे 75 वर्षासाठी होते का? हा प्रश्न आपल्याला पुढील पिढी विचारेल. असा प्रश्न उपस्थित केल्यास आपण काय करणार?. संविधानाचे रक्षण करण्यासाठी आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे. या संविधानाला नष्ट करण्याची हिंमत कोणाची आहे, हे मी बघतो. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे असे अव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
हेही वाचा: Uday Samant on Sanjay Raut : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेमुळे जातीय तेढ निर्माण, मंत्री उदय सामंत यांची टीका