ठाणे- वहिनीच्या अंत्ययात्रेला आला नाही म्हणून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून चौघेजण पसार झाल्याची खळबळजनक घटना आज समोर आली. ही घटना कल्याण पूर्वेकडे मुकादम चौकात घडली असून, याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्लेखोर चौकडी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन राजू जोगदंडे (वय २८) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नितीन राजू जोगदंडे हा तरुण कल्याण-शिळ मार्गावरील नेतीवलीतील एकता नगरमध्ये राहत असून त्याचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास भारत सोनावणे यांच्या कार्यालयासमोर नितीन याला आरोपी दीपक, टोनी, गणेश उर्फ झिंगा आणि सुन्या उर्फ बुवा या चौकडीने गाठले. माझ्या वहिणीच्या अंत्ययात्रेला का आला नाहीस, असा जाब विचारत गणेश उर्फ झिंगा याने शिवीगाळ करत ठोसा-बुक्क्याने नितीनला मारहाण केली.
दीपक याने सोबत आणलेल्या कोयत्याने नितीनच्या डोक्यावर, तर झिंग्याने हातावर वार केले. तर, बुवाने तेथे पडलेल्या दांडक्याने पाठ-पायांवर वार केल्याने नितीन जायबंदी झाला. त्यानंतर हल्लेखोर चौकडीने तेथून पळ काढला. या प्रकरणी जखमी नितीनच्या जबानीवरून कोळसेवाडी पोलिसांनी फरार हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- नवी मुंबईत नियमभंग करणाऱ्या 18 हजार पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई