सोलापूर - सहा हजारांवर लोकसंख्या असलेले कंदर हे गाव लोकप्रतिनिधी, आधिकारी आणि गावकऱ्यांच्या सहाय्याने पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, येथे मोठ्या प्रमाणावर केळी व्यापारासाठी येणाऱ्या गाड्या गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कंदर येथून जवळपास १०० ते १२० गाड्या दररोज येतात आणि जातात. या गाड्यांतून कोरोनाचा फैलाव होण्याचा संभव आहे. त्यामुळे गावकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा... चित्रपट निर्माते करीम मोराणी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल
करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव महत्त्वाचे मानले जाते. गावात असणारे सर्व रस्ते बंद केले असून केवळ कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये आणि गाव सुरक्षित राहावे, यासाठी पोलीस यंत्रणेच्या मदतीने, गावकर्यांनी गावचे रस्ते बंद केले आहेत. तसेच गावाची रात्रंदिवस काळजी घेत आहेत. मात्र, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या या गावाचा परिसर आणि जवळपास सर्व गावे पूर्णपणे बागायती क्षेत्र आहेत. या पट्ट्यात गेली अनेक वर्षापासून केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे एकंदर व्यापाराच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळे केळी, कलिंगड, टरबूज आणि इतर फळ खरेदीसाठी गाड्या पुणे, पनवेल, खारघर, नालासोपारा, भिवंडी, अंधेरी, तुर्भे जेएनपीटी ठिकाणावर जाऊन येत आहेत.
सध्या कोरोना विषाणूच्या भीतीमुळे गावात येणाऱ्या प्रत्येक गाडीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत कंदरच्या वतीने गावाजवळील वजनकाट्यावर गावात येणाऱ्या प्रत्येक गाड्या थांबवून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच कंदर येथील रस्ते व परिसराचे आतापर्यंत तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कंदर ग्रामपंचायतीच्या वतीने या उपाययोजना केल्या जात आहे.
हेही वाचा... बुलडाणा पोलिसांच्या सुरक्षेसाठी 'मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन' सुरू
कंदर येथे मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्ग आहे. येथे येणाऱ्या सर्वच गाड्या निर्जंतुकीकरण करून शेतकऱ्यांकडे जात नाहीत. शिवाय त्यांच्याकडून ग्रामपंचायतीला आवश्यक ते सहकार्य मिळत नाही. गावात जर कोरोनाचा फैलाव झाला, तर तो केवळ व्यापाऱ्यांच्या गाड्यांमुळे होऊ शकतो. त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासाठी कायमस्वरूपी दोन पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी कंदर गावच्या सरपंच मनीषा भांगे यांनी केली आहे.
बाहेरील गावाहून कंदर गावात येणाऱ्या नागरिकांचे सर्व्हेचे काम सुरू आहे. तसेच सरपंचांच्या सहकार्याने सामाजिक अंतर ठेवून भाजीमंडई बाजार भरवलेला आहे. तसेच किराणा दुकानदारांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. वाड्या वस्तीवरील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे, असे सांगितले आहे. तसेच केळी व्यापारी यांना परराज्यातील किती कामगार आहेत, त्यांना ओळखपत्र देण्याची सूचना संबंधित व्यापाऱ्यांना दिलेली आहे. तसेच त्यांची जबाबदारी संबंधित केळी व्यापारी यांच्यावर राहील, असे गावकामगार तलाठी उमेश बनसोडे यांनी म्हटले आहे.