बार्शी - हंगाम खरीप असो की रब्बीचा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलंच आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीची विक्रमी लागवड झाली. ज्वारीसाठी पोषक वातावरण होते, पीक देखील चांगले आले, मात्र ऐन काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावली आणि ज्वारी डागाळली त्याचा परिणाम दरावर झाला आहे. आतापर्यंत सर्वात कमी दराने ज्वारी विकण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढवली आहे. निकृष्ट दर्जाची ज्वारी 1200 रुपये तर चांगल्या प्रतीची ज्वारी 3 हजार रुपये क्विंटलने विकली जात आहे. पेरणी, मशागत, काढणी यावर होत असलेला खर्च पाहता शेतकरी एकच सवाल उपस्थित करत आहेत, तो म्हणजे सांगा शेती करायची कशी?
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला एक वेगळे महत्त्व आहे. मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या बार्शी येथील बाजारपेठेत उस्मानाबाद, लातूरसह बीड जिल्ह्यातील काही भागातून ज्वारीची आवक होते. उत्पादन जरी मराठवाड्यात अधिकचे असले तरी मागणी पश्चिम महाराष्ट्रातून जास्त होत असते. यंदा मात्र, ज्वारी पीक अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ज्वारीचा दर्जा तर ढासळला शिवाय कडब्याचेही नुकसान झाले. ज्वारीचा पेरा विक्रमी झाल्यामुळे आजही बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाकाठी 10 हजार क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. परंतु, हलक्या प्रतीच्या ज्वारीला केवळ 1200 रुपये तर चांगल्या प्रतीच्या ज्वारीला 3 हजार रुपये दर मिळत आहे. ज्वारी काढणीसाठी शेतकऱ्यांना एकरी पाच ते सहा हजारांचा खर्च येतो. तसेच पुरवठ्याच्या तुलनेत मागणी देखील घटल्याने ज्वारीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. ज्वारीतून केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना फटका
बार्शी येथील ज्वारी ही कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात निर्यात केली जाते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परीणाम दरावर झाला आहे. या भागातून दरवर्षीप्रमाणे ज्वारीची मागणीच झालेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना साठवणूक केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दिवसाकाठी 10 हजार क्विंटल ज्वारी बाजार समितीत दाखल होत आहे. आवक वाढल्याने दर घसरत आहेत शिवाय यावर्षी ज्वारी डागळल्याने देखील दरामध्ये घसरण झाली आहे.
ज्वारीची आवक वाढली
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसाकाठी 10 हजार क्विंटल ज्वारी येत आहे. उस्मानाबाद, भूम, परांडा, वाशी तसेच बीड आणि लातूर जिल्ह्यातील काही गावातूनही आवक होत आहे. मात्र, ज्वारीला मागणी नसल्याने व्यापारी ज्वारीची थप्पी लावून ठेवत आहेत. सध्या खरिपाची लगबग सुरू झाली आहे. मात्र ज्वारी विक्रीतून यंदा पुरेसा नफा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक आडचणीत सापडला आहे.
हेही वाचा -पर्यटनला जाण्याचा विचार करताय, तर ही बातमी अवश्य वाचा.. सरकार काढणार नवा आदेश !