सोलापूर - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशात विविध संघटनांनी एल्गार पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) शहरात वंचितकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजीपाला आणि कांदे फेकून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर वंचितच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना शेपूची भाजी भेट -
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितच्या नेते आणि कार्यकर्ते यांनी अचानकपणे येत, गेट समोर कांदे आणि भाजीपाला फेकला. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. वंचितचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी जिल्हाधिकारी यांना शेपूची भाजी भेट दिली.
हेही वाचा - आता देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही; उद्याच्या बैठकीत केंद्राने 'हा' निर्णय जाहीर करावा - शेट्टी
अन्यथा...
हा काळा कायदा मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा वंचितच्या वतीने यावेळी देण्यात आला. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांची एकच तारांबळ उडाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजूत घालण्याचा एकच प्रयत्न केला तसेच घोषणाबाजी करू नका, असे आवाहन केले. यानंतर पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वंचितकडून शांतपणे आंदोलन करण्यात आले.

Bharat Bandh : महाराष्ट्रात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद -
केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.
राज्याची उपराजधानी नागपुरात भारत बंदचा कुठलाही प्रभाव दिसून आलेला नाही. मात्र, शीख समाजाकडून नागपूर कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात जोरदार प्रदर्शन करण्यात आले होते. सोलापुरात या बंदला हिंसक वळण लागले. माकपच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये पोलिसांनी मारहाण केली. मुंबई शहरात भारत बंदचा खास परिणाम दिसून आलेला नाही. मुंबईतील बँकांचे व्यवहार नेहमीसारखे सुरू होते. बँकिंग जिल्हा या परिसरामध्ये सरकारी व खासगी बँकांची कार्यालये असून, भारत बंदचा कुठलाही प्रभाव येथील व्यवहारांवर आढळून आला नाही. मुंबईतल्या सीएसएमटी परिसरामध्ये बहुजन समाज पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.