पंढरपूर (सोलापूर) - राज्य सरकारने चार महिन्यांपूर्वी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराचे द्वार भाविकांसाठी खुले करण्यात आले. यामुळे पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली व विठुराया चरणी चार महिन्यांच्या कालावधीमध्ये भाविकांनी सुमारे एक कोटी एक लाख रुपयाचे दान अर्पण केले. यामध्ये प्रामुख्याने विठ्ठल मंदिर समितीच्या भक्तनिवासाकडून 24 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतर उत्पन्नाच्या स्रोतातून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या तिजोरीमध्ये 74 लाखांची भर पडली आहे.
भक्तनिवासामधून मंदिर समितीला 24 लाखांचे उत्पन्न -
पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त भक्तीनिवास बांधले आहे. या भक्तनिवासमध्ये सुमारे 1200 भाविक मुक्काम करू शकतील, अशी उभारणी करण्यात आली आहे. मात्र, मार्चमध्ये लॉकडाउन सुरु केल्यामुळे हे भक्तनिवास आठ महिने बंद होते. मात्र, दर्शन दसऱ्याच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले झाले. त्यानंतर नियम व अटींसह भक्तनिवासमध्ये भाविकांना राहण्याची परवानगी देण्यात आली. दोन महिन्यांमध्ये भक्त निवासकडून मंदिर समितीला सुमारे 24 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. भक्त निवासमध्ये वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दोनशे रुपये ते आठशे रुपयांपर्यंत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायांना परवडणाऱ्या दरात भक्तनिवास बांधण्यात आले आहेत.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पादनात वाढ
वैष्णवांच्या आराध्यदैवत असणाऱ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून विविध भाविक येतात. त्यातूनच विठ्ठला चरणी भाविक दान करतात. त्यातून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्न ठरवले जाते. जानेवारी महिन्यापर्यंत मंदिराला एक कोटी एक लाख रुपयांचे दान भाविकांकडून देण्यात आले आहे. तसेच मोठ्या यात्रा पंढपुरात भरत असतात. मात्र कोरोना महामारी मुळे यात्रा भरू शकले नाही. त्यातूनच विठ्ठल व रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पादनात मोठी घट झाली होती.
हेही वाचा - सावधान! बाजारातील 50 टक्के खाद्यतेल भेसळयुक्त! एफडीएच्या कारवाईतून धक्कादायक बाब समोर