सोलापूर - खरीप हंगाम 2020 ते 2021 दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला होता. राज्य सरकार आणि स्थानिक जिल्हाधिकारी यांनी पिकविम्या मार्फत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. पण आजतागायत खासगी इन्शुरन्स कंपनीने कोणत्याही प्रकारचा पीकविमा दिला नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शेतकऱ्यांना वेळेत पीकविमा न मिळाल्यास भविष्यात मोठे जनआंदोलन उभारू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतीवर पीकविमा उतरवण्यात आला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच खरीप हंगामातील उभे पीक वाहून गेले होते. राज्य शासनाने आणि स्थानिक जिल्हाधिकारी यांनी इन्शुरन्स कंपनी मार्फत मदत मिळेल, असे आश्वासन दिले होते. पण एक वर्ष लोटला परंतु आत्तापर्यंत एक रुपया देखील मदत मिळाली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. भारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावण्यात आले होते. त्याआधारे अनेक शेतकऱ्यांचे प्रकरणे रद्द करण्यात आली आहे. वेळेत पीकविमा न मिळाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीची नुकसानभरपाई न मिळाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे, असे सांगत शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले.
अचानक आंदोलन केल्याने पोलिसांची तारांबळ-
जिल्हाधिकारी कार्यालसमोर अचानकपणे मंगळवारी (3 ऑगस्ट ) दुपारी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी बंदोबस्तात उपस्थित असणाऱ्या पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. पोलिसांनी आंदोलकांना काही वेळातच ताब्यात घेतले आणि पुढील कारवाई सुरू केली. 5 जणांच्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.