सोलापूर - कौमी एकता मंचच्या माध्यमातून सोलापुरात राष्ट्रीय एकात्मतेसाठी उर्दू मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आले होते. या मुशायराच्या मंचावरून शायरांनी प्राप्त राजकीय परिस्थितीवर जोरदार शाब्दिक फटकारे लगावले. शायरांच्या या प्रहारांना सभागृहातील सोलापूरकरांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे.
या मुशायऱ्यासाठी राष्ट्रीय शायर राहत इंदोरी, बशीर परवाझ, नदीम फारुकी, वाहिद अन्सारी, आलम निजामी, असद बस्तवी, जमील असगर प्रतापगढी, मीर अफजल मीर आणि सोलापूरचे प्रसिद्ध शायर तालिब सोलापुरी यांनी हा मुशायरा सादर केला. यावेळी राहत इंदोरी यांच्या शब्दशैलीने सभागृह डोक्यावर घेतले. या मुशायऱ्याला मुस्लीम बहुल निरनिराळ्या आघाड्यातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या सोलापुरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विखुरलेल्या मुस्लीम कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.