पंढरपूर - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील विविध कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यातच माळशिरस तालुक्यातील तांबवे गावात रेड्यांच्या झुंजीचे आयोजन करणे गावकऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. तांबवे येथे रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केल्याबद्दल अकरा जणांवर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात कार्यक्रमांना बंदी असतानाही रेड्यांच्या झुंजीचे आयोजन
माळशिरस तालुक्यातील तांबवे येथे आकाश धनाजी लवंड, तोफिक शेख, सागर जाधव यांनी अन्य मित्रांच्या सहाय्याने तांबवे येथे रेड्यांच्या झुंजीचे आयोजन करून गर्दी जमवली होती. कोरोना पार्श्वभूमीवर निर्बंध असतानाही आयोजकांनी रेड्याच्य झुंजीचे आयोजन केले. आयोजकासह अकरा जणांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण किनगावकर यांनी फिर्याद दिली आहे.
प्राणी प्रेमी कडून रेड्यांच्या झुंजीवर बंदी घालण्याची मागणी...
माळशिरस व सांगोला तालुक्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रेड्यांच्या झुंजीचे आयोजन करण्यात येते. यामुळे मुक्या प्राण्यांचा छळ होत असतो. त्यामुळे अशा झुंजीवर बंदी घालण्याची मागणी प्राणीप्रेमीकडून केली जात आहे.