सोलापूर- अक्कलकोट राजघराण्याच्या संस्थानिक राजकुमारी सुनिताराजे भोसले यांचे सोमवारी पहाटे अडीच वाजता पुण्यात निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मावळली. अक्कलकोट तालुक्यातील सर्वधर्मीय रयतेनं साश्रुपूर्ण नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

अक्कलकोट राजघराण्याच्या संस्थानिक राजकुमारी सुनिताराजे भोसले यांचे सोमवारी पहाटे अडीच वाजता पुण्यात निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांचे पार्थिव मंगळवारी अक्कलकोट येथील नवीन राजवाड्यात आणण्यात आले होते. सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी अक्कलकोटकरांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, सायंकाळी साडे 5 वाजता नवीन राजवाडा येथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली.
नवीन राजवाडा, बसस्थानक, समाधी मठ, कारंजा चौक, कापड बाजार, सावरकर चौक, समर्थ चौक, राजे फत्तेसिंह चौक, कमलाराजे चौक मार्गे थडगे मळा (आनंद बाग) येथे अंत्ययात्रा विसावली. मंत्रोपचारात मालोजीराजे तिसरे यांनी त्यांच्या चीतेला मुखाग्नि दिला. यावेळी राजघराण्याचे मानकरी महेश इंगळे, बाबासाहेब निंबाळकर, पांडुरंग काटकर, अरविंद घाटगे यांनी सुनिताराजे यांच्या पार्थिवाच्या पालखीस खांदा दिला. सुनिताराजे यांच्या दर्शनासाठी प्रमुख मार्गावरुन नागरिकांनी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती. या अंत्ययात्रेसाठी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, बी. टी. निंबाळकर, राज भालेराव, कोल्हापूरचे समरजितसिंह घाटगे, मुकूंद घाटगे, नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. सिध्दाराम म्हेत्रे, जि. प. कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, न. प. पक्षनेते महेश हिंडोळे, तुळजापूरचे अण्णासाहेब कदम, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे आणि नागरिक उपस्थित होते.
सुनीताराजे भोसले यांचे कार्य
सुनीताराजे भोसले ह्या अक्कलकोट संस्थानकालीन स्थापन झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा होत्या. अक्कलकोट शहरात वीज निर्मिती, महाराष्ट्रात सर्वप्रथम नळाव्दारे पाणीपुरवठा करण्याची संकल्पना, सांगवी जलाशय, कापड निर्मिती, मुलींची पहिली कन्या प्रशाला, वरिष्ठ प्राथमिक शाळा या संस्था त्यांनी स्थापन केल्या. नवीन राजवाडा, जुना राजवाडा, जुना पॉवर हाऊस, लक्ष्मी मंडई, शस्त्र संग्रहालय यांचे निर्माण त्यांच्याच कारकीर्दीत झाले आहे.