सिंधुदुर्ग - बालवय म्हणजे हसण्याखेळण्याचे आणि धमाल मस्तीचे असते. मात्र, कोरोनामुळे राज्यावर आलेल्या आर्थिक संकटाच्या जाणिवेने हवालदिल झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आचारा येथील दिविजा जगन्नाथ जोशी वय वर्षे पाच या चिमुरडीने आपला पाचवा वाढदिवस साजरा न करता त्यासाठीचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे. तिच्या या दानशुरतेने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
जागतीक महामारी समजल्या जाणाऱ्या कोरोनामुळे संपुर्ण जगावर आर्थिक संकट कोसळले आहे. आपल्या देश, राज्यालाही या आर्थिक संकटाचा फटका बसला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कसला निधी आणि काय याची समजही नसणाऱ्या वयात आई वडिलांच्या चर्चेतून ऐकू आलेल्या या गोष्टीबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. त्यानंतर दिविजाने या बद्दल माहिती घेत आपल्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा हट्ट पालकांकडे धरला.
आचरा पिरावाडी येथील पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांची दिविजा ही मुलगी. तीच्या पालकांनी आपल्या कन्येचा 18 एप्रिल रोजी होणारा पाचव्या वाढदिवस मुलीच्या हट्टापायी घरी साजरा न करता त्यासाठी होणारा दोन हजार रुपये खर्च कोरोनाग्रस्ताच्या मदतीसाठी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला. बालवयातच दानशूरतेचे धडे देणाऱ्या दिविजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.