सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील झाराप-पत्रादेवी मार्गावर नेमाळे येथे अज्ञात वाहनाने एका रानगव्याला धडक दिली. या धडकेत रानगव्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सावंतवाडी तालुक्यातील नरेंद्र डोंगर परिसरातील शौचालयाच्या टाकीत काही दिवसांपूर्वी गवा पडल्याची घटना घडली होती. त्याला बाहेर काढण्यास यश आले होते. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी झाराप-पत्रादेवी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका रानगव्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांकडून घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहाय्यक वन्यजीवसंरक्षक सुभाष पुराणीक, गजानन पानपट्टी, कटके, राणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गव्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडीमधील डोंगर परिसरात ६ ते ७ रानगव्यांचा कळप फिरत आहे. दिवसा ढवळ्या अनेकांच्या दृष्टीस हा कळप पडत आहे. रानगव्यांकडून शेतीची मोठी नासधूस होत आहे. जंगली गव्यांचा शहरी भागांत मुक्त संचार सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.