सिंधुदुर्ग - सावंतवाडी येथील प्लास्टिक दुकानाच्या गोडाऊनला शनिवारी भीषण आग लागली. शहरातील माठेवाडा परिसरात बसवराज गुरव यांच्या मालकीच्या नंदी दुकानाचे हे गोडावून होते. सायंकाळी साधारणतः साडे सहाच्या सुमारास ही भीषण आग लागली.
यामध्ये गोडावून मधील संपूर्ण माल जळून खाक झाला आहे. गोडावूनमध्ये सर्व प्लास्टिकचा माल असल्याने ही आग अधिकच भडकली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच सावंतवाडी नगर परिषद आणि खासगी बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे तब्बल एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आले. गोडावून मधील सर्व माल जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे वृत्त कळताच नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि इतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.