सिंधुदुर्ग - कोरोनामुळे संकटात सापडलेला कोकणातील शेतकरी आता सावरताना दिसत आहे. येथील शेतकरी सध्या शेती कामात व्यस्त झाला आहे. भातशेती बरोबरच बांबू लागवडही सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात केली जाते. कुडाळमधील शेतकरी सध्या मानगा जातीच्या बांबूची लागवड करताना दिसत आहे. सध्या सिंधुदुर्गात चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी बांधावर बांबू लागवड करण्यात व्यस्त झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८०० हेक्टर क्षेत्रात बांबूची लागवड आहे. काही भागात नैसर्गिकरित्या वनांमध्ये बांबू रुजून येतो ते क्षेत्र वेगळेच आहे. शिवाय शेतकऱ्याच्या बांधावरही पारंपरिक बांबू लागवड आहे. या सर्व शेत्रातून केवळ माणगा जातीच्या बांबूचे दरवर्षी २ हजार ट्रक उत्पन्न येथील शेतकऱ्याला मिळते. जिल्ह्यात बांबूचे उत्पादन घेणारे १० हजार शेतकरी आहेत. कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय यातून शेतकऱ्यांना चांगले उपन्न मिळते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणारी माणगा ही महाराष्ट्रातील किंबहुना, देशातील एकमेव अशी बांबूची जात आहे. माणगा जातीसोबत चीवार ही दुसरी एक जात जिल्ह्यात सापडते. सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरे तर ही छुपी अर्थव्यवस्था आहे. येथील शेतकरी बांबूच्या शेतीला खात्रीशीर परतावा देणारे उत्पन्न मानतो. एमआरजीएस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासनाने अनुदानही मिळते. त्यामुळे भातशेती बरोबरच बांबू लागवडीकडे कोकणातील शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.