सिंधुदुर्ग - कोकण दौऱ्यावर असलेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकावर शब्दांचे आसूड ओढले आहेत. सामना पेपर कोणी वाचत नसल्याचे सांगून शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या कोकणात सामनाच्या किती प्रती येतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या जिल्ह्यात सामना पेपर येत नसल्याचे सांगून त्यांनी आपण सामना कधीच वाचत नसल्याचेही सांगितले. पेट्रोल दरवाढीवरून आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पडळकरांनी सामनावरून शिवसेनेवर निशाणा साधला.
आमदार गोपीचंद पडळकर यांचा शिवसेनेवर निशाणा कोकणात सामना किती येतो?
आधी पेट्रोलचे भाव कमी करा, मग राम मंदिरासाठी निधी जमा करा' या सामनात आलेल्या अग्रलेखावर गोपीचंद पडळकर यांनी खरमरीत टीका केली आहे. सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता, मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, कोकणात सामना किती येतो? असा सवालही पडळकरांनी यावेळी केला आहे.
मी तर सामना कधीच वाचला नाही
यावेळी बोलताना पडळकर म्हणाले उगाच बाऊ करू नका. आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळे असल्या विषयात बोलणे बरोबर नाही, असेही ते म्हणाले.
सरकारला जनताच रस्त्यावर फिरू देणार नाहीकोरोना आणि अधिवेशन याबाबत बोलताना ते म्हणाले. या सरकारला कुठल्याच विषयाचं गांभीर्य नाही. कोरोनाच्या काळात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाला. कोरोना झाला म्हणून जर तुम्ही अधिवेशन टाळणार असाल तर महाराष्ट्राची जनता सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. या महाविकास आघाडी सरकारला जनताच रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
ऊर्जा मंत्र्यांनी लोकांना फसवले-विधानसभेत ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केले होत, की लॉकडाऊन काळात 100 युनिटपर्यंत ज्यांचे बिल आलेले आहे ते आम्ही माफ करू. नंतर 100 ते 300 युनिटपर्यंत बिल आले, त्यांना आम्ही मदत करू असे ऊर्जामंत्री म्हणाले होते. नंतर मग त्यांनी घुमजाव केला. उर्जामंत्र्यांनी ही फसवणूक केली असल्याचा आरोपही पडळकरांनी यावेळी केला.
धनगर समाज आरक्षणावर आमची भूमिका आजही ज्वलंत-गोपीचंद पडळकर यांनी यावेळी धनगर समाज आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, धनगर समाज आरक्षणावर आमची भूमिका आजही ज्वलंत आहे. कोरोना काळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांना काही कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्याकडे उपचार करण्याइतकी परिस्थिती नाही. मात्र आमची भूमिका आजही ज्वलंत असल्याचेही पडळकरांनी स्पष्ट केले.