सातारा - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात फक्त २५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाऊस लवकर आणि वेळेत न पडल्यास कोयनेपासून ते सांगलीपर्यंत नदीकिनारी असणाऱ्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. कोयना नदीपात्रात रोज सोडण्यात येणाऱ्या १ टीएमसी पाणी कमी करून हा साठा शिल्लक आहे. तो पाऊस येईपर्यंत पुरवण्याची गरज सद्यस्थितीत निर्माण झाली आहे.
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता सुरुवातीला ९८ टीएमसी होती. हे पाणी अपुरे पडत असल्याने धरणाची साठवण क्षमता ७.२५ टीएमसीची वाढ केली. त्यानंतर १०५.२५ टीएमसी करण्यात आली.
धरणाच्या एकूण ९८ हजार दशलक्ष घनफूट म्हणजेच २७९६ दशलक्ष घनमीटर पाणी शेतीसाठी राखून ठेवले जाते. हे पाणी पूर्वेकडे सोडताना १८ मेगावॅटच्या २ सयंत्राच्या कोयना धरणात पाण्याचा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पूर्वेकडे पाठवले जाते. अशा तऱ्हेने कोयना जलविद्युत प्रकल्प एकूण १९९६ मेगावॅट वीज निर्मिती करू शकतो. १ जून ते ३१ मे या वर्षभरातील कालावधीसाठी पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी ६७.७ टीएमसी पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात येतो. यापैकी जून ते मार्च अखेरपर्यंत या महिन्यात ३२.६ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे.
कोयना धरणातून रोज २१.२० क्युसेक्स पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. तर १००० पायथ्यालगत असणाऱ्या नदी विमोचकातून नदीपात्रात सोडले जात आहे. असे एकूण रोज २ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हे पाणी सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैसाळ आणि कोयने पासून ते सांगलीपर्यंत नदीकिनारी असणाऱ्या शेती उपसा योजना आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या उपयोगासाठी होत आहे.
कोयना धरणात सध्या फक्त २५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून एका महिन्याचा कालावधी आहे. त्यातच हवामान विभागाने पाऊस लांबणीवर असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे धरणात किती पाणी साठा शिल्लक राहणार, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.