सातारा - पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या एका मार्गावर लावण्यात आलेला श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक आहे. तो फलक शनिवारी (दि. 9 जाने.) सकाळी फाटलेल्या स्थितीत आढळला. ही बाब निदर्शनास येताच उदयनराजे समर्थकांनी निषेध नाेंदवत मूक मोर्चा काढून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, हा फलक वाऱ्याने फाटला असल्याचा खुलासा सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस प्रशासनाने केला आहे.
फलक फाडल्याच्या संशयाने तणाव
छत्रपती संभाजीराजे भोसले भुयारी मार्ग, असा फलक शुक्रवारी (दि. 8 जाने.) रात्री फाटल्याचे लक्षात येताच उदयनराजे समर्थकांनी पाेवई नाका येथे जमण्यास सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अॅड. दत्ता बनकर, सुनील काटकर, संग्राम बर्गे, किशोर शिंदे, बाळासाहेब ढेकणे तसेच शंभरहून अधिक कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे हे घटनेचे गांभीर्य ओळखून हजर झाले.
मूक मोर्चा काढून निषेध
सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मांजरे यांनी राजे समर्थकांची समजूत काढून त्यांच्याशी चर्चा केली . साताऱ्यात महापुरुषांचा फलक फाटल्याचा प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अॅड दत्ता बनकर यांनी केली. नगराध्यक्ष माधवी कदम व सुनील काटकर यांनी या मागणीचा पुनरुच्चार करत फलक फाडणाऱ्या अपप्रवृत्तींचा निषेध केला. राजे समर्थकांनी वायसी (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय) कॉलेज ते पोवई नाका असा मूक मोर्चा काढून पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही फुटेज
दरम्यान, संबंधितांना शाेधून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी उदयनराजे समर्थकांनी पाेलिसांना केली. सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञाताचा शोध घेण्याची शहर पोलिसांची कारवाई सुरू केली. सातारा पोलीसांनी तपास करुन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता संभाजी महाराजांच्या नावाचा बॅनर हा नैसर्गिकरित्या फाटून खाली पडल्याचे दिसून आले, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांचे आवाहन
रहिमतपूर स्टॉप जवळील ग्रेड सेपरेटरच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर असणारा संभाजी महाराजांच्या बॅनर हा नैसर्गिकरित्या फाटून खाली पडला असल्याचे निष्पन्न झाल्याने कोणीही त्याबाबतची प्रतिक्रिया देण्याचे टाळावे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा - पाहणी करायला गेले अन् उद्घाटन करून आले
हेही वाचा - घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक, कराड ग्रामीण गुन्हे प्रकटीकरणची कारवाई