कराड (सातारा) - कृष्णा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणार्या उपकरणाचे संशोधन करण्यात आले आहे. हे पीपीई कीट परिधान करणार्या डॉक्टरांच्या शरीराचे तापमान देखील सामान्य राहण्यास मदत होणार आहे.
कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार्या डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचार्यांना पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. परंतु, पूर्णपणे पॅकबंद असलेल्या पीपीई कीटमध्ये हवेचे योग्य संतुलन होत नसल्याने सेवासुश्रुषा करताना डॉक्टर्स व आरोग्य कर्मचार्यांना त्रासदायक ठरत होते. हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने कृष्णा वैद्यकीय अभिमत विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने संयुक्तरित्या संशोधन करून पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणारे उपकरण शोधले.
संशोधित केलेल्या उपकरणात 0.1 मायक्रॉन आकाराचा हेपा फिल्टर बसविण्यात आला आहे. कोविड-19 चा विषाणू हा यापेक्षा मोठ्या आकाराचा असल्याने त्याचा शिरकाव या उपकरणाद्वारे पीपीई कीटमध्ये होऊ शकत नाही.
तसेच हे उपकरण वजनाला हलके असून हाताळण्यासही सोपे आहे. त्यामुळे डॉक्टरांसह नर्सेस, वॉर्ड बॉय व अन्य कर्मचार्यांना हे उपकरण आरामदायी पद्धतीने वापरता येणार आहे.
कृष्णा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने केलेल्या अनेक संशोधनाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. यापूर्वी कृष्णा विद्यापीठाने पर्यावरणपूरक मास्कसह वैद्यकीय उपकरणांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणार्या युव्ही सेवक 360ओ या उपकरणाचे देखील संशोधन केले आहे. या उपकरणामुळेच पीपीई कीट निर्जंतुकीकरण करून पुन्हा वापरणे शक्य झाले आहे.
पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणार्या उपकरणाच्या संशोधन आणि विकासासाठी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. विठ्ठल धूळखेड, डॉ. अर्चना गौतम, कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमाकांत श्रीवास्तव, डॉ. सुहास देशमुख, संशोधक विद्यार्थी चारूदत्त जगताप, निखिल भिसे, अक्षय गावडे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.