सातारा - महाराष्ट्र राज्याची भाग्य लक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. धरणात 29 हजार 628 क्युसेक इतकी पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा शतकाच्या उंबरठ्याकडे चालला असून 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या धरणात आजच्या घडीला 99.63 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. शनिवार पर्यंत कोयना धरणात एकूण 105 टीएमसी एवढे पाणी आले होते. मात्र, पूर स्थिती निर्माण होऊ नये म्हणून वेळच्या वेळी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
सध्या कोयना धरणात 99.63 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या धरणातील पाण्याची टक्केवारी 94.66 इतकी झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच चालू राहिले तर पाच दिवसात धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. शनिवारी कोयनानगर येथे 16, नवजा येथे 27 आणि महाबळेश्वर येथे 38 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होऊन धरणातील पाणीसाठा 99.63 टीएमसी इतका झाला आहे. तर पश्चिम घाटातील अतिपर्जन्यवृष्टी क्षेत्रातही पावसाचे प्रमाण वाढले आहे. प्रतापगड , सोनाट, बामणोली, काठी या ठिकाणी देखील पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. जलाशयातील पाणीपातळी 2159.02 फूट व 658.114 मीटर इतकी झाली आहे.