सांगली- तब्बल बारा तासांपासून स्थिर असलेला कृष्णा नदीचा महापूर आता ओसरायला सुरुवात झाली आहे. नदीच्या पाणी पातळीत आता दोन इंचाने घट झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीला महापूर आला आणि या महापुराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. 57.5 फुटांपर्यंत पोहोचलेली पाणीपातळी आता कमी होऊ लागली आहे. सांगलीमध्ये दहा तासांपूर्वी पाण्याच्या पातळीमध्ये वाढ कायम होती. त्यामुळे सांगली शहरातल्या आणखी भागांमध्ये पुराचे पाणी शिरू लागले होते. तर या पुरात अद्यापही हजारो लोक अडकून पडले आहेत.
सांगली शहरातील आणखी काही भागांमध्ये पाणी शिरू लागल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पाण्याची पातळी आणखी किती वाढेल, त्याबाबत अनेक अफवा पसरत होत्या. मात्र, सातारा कोयना, कृष्णा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावल्याने आणि कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग यामुळे आता कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून 57.5 स्थिरावलेली पाणी पातळी आता दोन इंचाने कमी झाली आहे. 57.4 पाणीपातळी झाली असून हळू कृष्णा नदीची पाणीपातळी ओसरेल, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.