सांगली - राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अखेर सुरेश खाडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना कॅबिनेटमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुरेश खाडे मुंबईकडे रवाना झाले आहेत. खाडे यांचे नाव निश्चित झाल्याच्या चर्चेमुळे भाजपच्या मिरजेतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सांगली जिल्ह्याला स्थान मिळणार का नाही? याबाबत संपूर्ण जिल्ह्याला उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपचे चार आमदार असणाऱ्या जिल्ह्याचा मंत्रीपदाचा दुष्काळ हटणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. जिल्ह्यातून शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांची नावे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. पण, उद्या पार पडणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश खाडे यांचे नाव आघाडीवर असून संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात खाडे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांकडून सुरेश खाडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असल्याने अभिनंदनाच्या पोस्टही व्हायरल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला रविवारी पार पडणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शनिवारी दुपारी आमदार खाडे मुंबईकडे तातडीने रवाना झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर खाडे यांना मंत्रिपद मिळणार, या चर्चेमुळे मिरजेतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.