सांगली - शहरात आज एसटीचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ढोल-ताशांच्या गजारत केक कापून एसटी प्रशासनाने 'लालपरी'चा वाढदिवस साजरा केला. तसेच सुखकर प्रवासासाठी एसटीची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले.
गोरगरिबांच्या सेवेत असणाऱ्या लालपरीला आज ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सांगलीच्या एसटी बस स्थानकाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सोबतच शिवशाही बसलाही सजवण्यात आले होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ आणि महापौर संगीता खोत यांच्या हस्ते केक कापून एसटीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सांगली एसटी आगाराकडून दरवर्षी एसटीचा वाढ दिवस साजरा करण्यात येतो. यंदाही मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या वाढदिवसानिमित्त एसटीचे अधिकारी, कर्मचारी, सेवक, तसेच प्रवासी उपस्थित होते. यावेळी प्रवाशांना एसटी प्रशासनाकडून गुलाब पुष्प देऊन सुखकर प्रवासासाठी एसटीनेच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले.