सांगली - मुलीला लग्नाचे आमिष दाखवत नशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. अजय उर्फ अविनाश संजय पवार असे या तरुणाचे नाव असून इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांमध्ये प्रेम झाले होते.
धक्कादायक बाब म्हणजे मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करत तिच्या सोबत काढलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. सांगलीतील एका २२ वर्षीय मुलीची एक वर्षापूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून अहमदनगर येथील अजय उर्फ अविनाश पवार या तरुणासोबत मैत्री झाली. काही दिवसात या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि यानंतर अजयने लग्नाच्या आमिषाने वेळो-वेळी मुलीवर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार केला.
या दरम्यान, मुलीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार करून त्याचे फोटो व व्हिडिओ सुद्धा काढले होते. तर काही दिवसांपूर्वी लग्नाच्या कारणातून दोघांच्यामध्ये वाद झाल्याने अजयने फेसबुक, व्हाट्सअपवर मुली सोबतचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याने पीडित मुलीने सांगली शहर पोलिसांमध्ये धाव घेत अजयच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावरून अजयवर बदनामी, फसवणूक, बलात्कार असे गुन्हे दाखल करत सांगली शहर पोलिसांनी संशयित पवार यास अहमदनगरमधून अटक केली आहे.