सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस काँग्रेसकडून आंदोलन करून साजरा करण्यात आला आहे. 'बेरोजगार दिन' म्हणून मोदींचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. यासह केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीचा निषेधही नोंदवण्यात आला आहे.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमीत्त भाजपाकडून सेवा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा 'बेरोजगार दिन' म्हणून सांगलीमध्ये युवक काँग्रेसच्यावतीने साजरा करण्यात आला. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या गेल्या सहा वर्षातील कारभाराचा निषेध म्हणून लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातील लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केल्याने तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, लॉकडाऊननंतर ही संख्या आणखी वाढली आहे. तरुणांना बेरोजगार करण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा निष्क्रिय कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने हा दिवस 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा केला आहे.
सांगलीतील काँग्रेस कमिटी समोर धरणे आंदोलन करत नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सोबतच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा ही निषेध नोंदवला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून आधीच लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेला शेतकरी कांदा निर्यात बंदीच्या आदेशामुळे आत्महत्या करेल आणि याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाजप सरकार असेल, असे म्हणत तरुणांना रोजगार मिळवून द्यावा आणि तातडीने निर्यात बंदीचा आदेश रद्द करावा, अशी मागणी यावेळी सांगली जिल्हा युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा - चीनची नवी खेळी? सीमेवर लाऊडस्पीकर लाऊन चीनी सैनिक वाजवतायत पंजाबी गाणी