सांगली - मिरजेचे भाजपा आमदार सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील सात सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली असून आमदारांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि या कोरोनाच्या विळख्यात आता मिरजेचे भाजपा आमदार व माजी मंत्री सुरेश खाडे देखील सापडले आहेत. बुधवारी रात्री उशीरा खाडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनतर तातडीने प्रशासनाने खबरदारी उपयोजना सुरू करत आमदार खाडे यांच्या कुटुंबासह 16 जणांची कोरोना चाचणी केली.
त्यामध्ये 8 जण कोरोना पोझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आमदारांच्या पत्नी, 2 सूना, दोन नातवंड व एक मानलेली बहीण यांचा समावेश आहे, तर आमदारांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मिरज-सांगली रस्त्यावरील नवीन झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आमदार व त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत, तर उर्वरित कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईकांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे.