सांगली - खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत या निषेधार्थ इस्लामपूर येथील प्रकाश कोविड रुग्णालयातील डॉक्टर व कर्माचारी संपावर गेले आहेत. काम बंद ठेवून डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी प्रशासना विरोधात आंदोलन करत खोटे गुन्हे मागे न घेतल्यास रुग्णालयात एकही रुग्ण दाखल करून घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासना विरोधात डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
इस्लामपूर येथील प्रकाश रुग्णालयात 50 बेडचे कोरोना सेंटर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर संबंधित मृताच्या नातेवाइकांनी मृतदेहाची विटंबना आणि भरमसाठ बील घेतल्याची तक्रार करत प्रकाश रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पाच जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात केली होती. यावरुन ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. तर दाखल झालेले गुन्हे प्रशासनाकडून एकतर्फी कारवाई करत करण्यात आल्याचा आरोप रुग्णालय प्रशास व डॉक्टरांकडून करण्यात आला होता. या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी (दि. 27 मे) प्रकाश कामगार युनियन या रुग्णालयाच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. रुग्णालयासमोर डॉक्टरांसह नर्सिंग स्टाफने ठिय्या आंदोलन करत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला आहे.
...अन्यथा एकही रुग्ण दाखल करून घेणार नाही
कोरोना परिस्थितीमध्ये डॉक्टर कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. मात्र, अशा पद्धतीची करण्यात आलेली कारवाई अत्यंत चुकीची असून प्रशासनाने तातडीने दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याबाबत प्रशासनाने भूमिका न घेतल्यास पुढील काळात रुग्णालयात एकही रुग्ण दाखल करून घेणार नसल्याचे प्रकाश कामगार युनियनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा - आर्थिक संकटात 'नमराह कोविड हॉस्पिटल' गरिबांसाठी बनलंय संजीवनी