सांगली - महापालिकेच्या उपयोगकर्ता कराच्या विरोधात दलित महासंघाच्यावतीने आज वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करण्यात आले. एका गटाने अर्धनग्न होऊन भीक मागत तर एका गटाने निदर्शने व रस्ता रोको आंदोलन करत पालिकेच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला आहे.
हेही वाचा - राजू शेट्टी म्हणतात... तर अर्थसंकल्पाबाबत अधिक आनंद झाला असता
सांगली महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील नागरिक, व्यापारी, हातगाडी फेरीवाले अशा सर्वांना शहर स्वच्छतेसाठी उपयोगकर्ता कर लागू करण्यात आला आहे. 450 रुपये वार्षिक शुल्क भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात येत आहेत. मात्र, या कराविरोधात सांगलीतील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. दलित महासंघाच्या वतीने आज वेगवेगळ्या पातळ्यांवर सांगली महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
शहरातील राजवाडा चौकातून पालिकेवर काढण्यात आलेल्या या मोर्चात दलित महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी पालिकेसमोर उपयोगकर्ता करा विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. अर्धा तास होऊनही निवेदन स्वीकारण्यास पालिकेच्यावतीने कोणीही न आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पालिकेच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर ठिय्या मारत रास्ता रोको केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांची समजूत काढली, आणि रस्ता रिकामा केला.
मात्र या रस्ता रोकोमुळे काही वेळ वाहतूक विस्कळित झाली होती.
दलित महासंघाच्या शहर विभागाच्यावतीने पालिकेच्या उपयोगकर्ता कराविरोधात शहरातून अर्धनग्न होऊन भीक मागो आंदोलन करण्यात आले. गेल्यावर्षी येऊन गेलेल्या महापुरामुळे सांगली शहरातला नागरिक, व्यापारी, हातगाडी चालक, फेरीवाले हे सर्वच उघडयावर आले होते. आता कसे-बसे जीवनमान सुरळीत होत असताना पालिकेने अन्याय कारक कर लादून गरिबांना उघडयावर आणत असल्याचे आंदोलक म्हणाले आहेत.
पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी अर्धनग्न होऊन भीक मागो मोर्चा काढण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पालिका कार्यालयापर्यंत यावेळी रस्त्याने पालिकेच्या नावाने भीक गोळा करण्यात आली. या अनोख्या पद्धतीने पालिकेच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तर या मोर्चाद्वारे जमा करण्यात आलेली रक्कम यावेळी पालिकेचा स्वाधीन करत येत्या आठ दिवसात हा कर रद्द करण्यात यावा, अन्यथा पालिका कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशारा यावेळी दलित महासंघाच्यावतीने देण्यात आला.
हेही वाचा - महा'अर्थ' संकल्प : 'महाराष्ट्र शिकावू उमेदवार प्रोत्साहन; बेरोजगारांच्या हाताला देणार काम