सांगली - जिल्ह्यातील चित्रपट गृहांचा रुपेरी पडदा चित्रपटांच्या व रसिकांच्या प्रतीक्षेत आहे. लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या चित्रपटगृहाचे लॉकडाउनच्या संकटात सुमारे बारा ते पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जाचक अटी, न परवडणारा खर्च यामुळे शासनाने बंदी उठवली आहे. मात्र तरीही सांगली जिल्ह्यासह इस्लामपूरातील चित्रपटगृह बंद आहेत.
मालकांवर आर्थिक भार
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एक पडदा चित्रपटगृह मोडकळीस आले. शहरातील रसिकांच्या सोयीसाठी काही प्रमाणात एकपडदा चित्रपटगृह हा व्यवसाय टिकून आहेत. कोराना कालावधीत चित्रपट गृह बंदची घोषणा झाली होती. त्यानंतर नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा शासनाने काही अटी घालून चित्रपटगृहे सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र नऊ महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्याने ते चालवण्यासाठी येणारा खर्च कुठून द्यायचा हा प्रश्न सध्या मालकांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका तसेच पालिका क्षेत्रातील चित्रपट गृहांचे थकित कर माफ करावे, अशी मागणी होत आहे. कामगार पगार, वीजबिल याचा भार मालकांवर आहे.
चित्रपटगृहांना समस्यांचा सामना
नवीन चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्याने रुपेरी पडदा सुरु करावा की नको, अशी द्विधा मनस्थिती चालकांची झालेली आहे. चित्रपटगृहांना तोट्याचा व्यवसाय म्हणून टाळा ठोकला आहे. जी चित्रपटगृहे सुरू आहेत त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पर्यायाने उत्पन्नात घट झाली आहे. शासनाने परवानगी दिली. प्रत्येक शो नंतर सॅनिटायझर करणे, रसिकांचे तापमान तपासणे, रसिकांनी मास्क लावून चित्रपट पाहणे, बैठक व्यवस्थेच्या 50% रसिकांना प्रवेश देणे या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मनोरंजनाच्या साधनात दिवसेंदिवस बदल होत असल्यामुळे करमणूक प्रधान व्यवसाय मोडकळीस आला. अगोदरच आर्थिक खाईत सापडलेल्या या व्यवसायाला ऊर्जितावस्था कशी येणार याबाबत चित्रपटगृहांच्या मालकांना साशंकता आहे.
हेही वाचा - कात्रजजवळ आठ वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात; पाच जखमी