रत्नागिरी- जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. धक्कादायक म्हणजे जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आणखी 11 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरी 6, कळंबणी 3, तर लांजा येथील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 683 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता 8 जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, जिल्ह्यातील दोन वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्याने आता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.